व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

टोमॅटो शेती साठी आवश्यक जमीन | शेती तयार करणे व रोपांची लागवड.

जमीन :

चांगला निचरा असलेल्या मध्यम काळ्या जमिनीत किंवा पोयट्याच्या जमिनीत हे पीक चांगले येते.  हलक्‍या जमिनीत पीक लवकर निघते, तर भारी जमिनीत फळांचा तोडा उशिरा सुरू होतो; परंतु उत्पादन भरपूर निघते.  पावसाळी टोमॅटो शेती साठी काळीभोर जमीन टाळावी, तर उन्हाळी टोमॅटो पीक हलक्‍या व उथळ जमिनीत घेऊ नये.  जमिनीचा सामू हा ६ ते ७.५च्या दरम्यान असावा.  जास्त पावसाच्या भागासाठी हलकी ते मध्यम जमीन निवडावी व त्यास योग्य उतार द्यावा, म्हणजे पावसाचे पाणी उभ्या पिकात साठून राहणार नाही.  क्षारयुक्त चोपन व पाण्याचा निचरा नसलेल्या जमिनीत हे पीक चांगले येत नाही. त्यामुळे पिकांची वाढ खुंटते व फुलगळ होते. जमिनीत चर काढले तर अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो व पाणी जर क्षारयुक्त असेल तर क्षारांचाही निचरा होतो.  अगोदरच्या हंगामात टोमॅटोवर्गीय पिके म्हणजेच वांगी, मिरची ही पिके घेतलेली नसावीत. त्यामुळे कीड व रोगांचा जास्त प्रादुर्भाव होतो. तसेच निमॅटोड असणाऱ्या जमिनीत टोमॅटोची शेती करू नये.

लागवडीसाठी जमीन तयार करणे :

जमीन उभी-आडवी खोलवर नांगरून घ्यावी. चांगली कुळवणी करून घ्यावी. त्या वेळी २० टन प्रतिहेक्‍टरी चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून घ्यावे. जमिनीत असलेल्या गवताच्या काड्या, हरळीच्या काश्‍या, लव्हाळागाठी चांगल्याप्रकारे वेचून जाळून टाकाव्यात.  उत्तम प्रतीच्या भारी जमिनीत ९० ते १२० सें.मी. अंतरावर, तर हलक्‍या जमिनीत ६० ते ७५ सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून जमिनीच्या उतारानुसार वाफे बांधून घ्यावेत.  लागण करते वेळी दोन रोपांतील अंतर ४५ ते ६० सें.मी. ठेवावे. शक्‍यतो लागवड ९० x ३० सें.मी. अंतरावर करावी. ३.६० x ३.०० मी. आकारमानाचे वाफे तयार करावेत.

रोपांची लागवड : 

टोमॅटोची रोपे तयार झाल्यानंतर लागवडीच्या वाफ्यांना आठवड्यापूर्वी पाणी देऊन वाफसा स्थिती ठेवावी. लागवडीच्या दिवशी वाफ्यांना पुन्हा पाणी द्यावे. वाफ्यांमध्ये पाणी असतानाच ओल्यातच रोपांची लागवड करावी.  मरगळलेली, इजा झालेली, मुळे कमी असणारी, वाकडे व चपटे खोड असणारी तसेच रोगट रोपे लागवडीसाठी घेऊ नयेत.  लागवडीपूर्वी रोपे कार्बोसल्फान १० मि.ली. व कार्बेन्डाझिम १० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या द्रावणात बुडवून घ्यावीत.  रोपे लावताना रोपांच्या खोडावर दाब देऊ नये. नाजूक खोड ताबडतोब पिचल्याने अशी रोपे नंतर दगावतात.  लागवड केल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आंबवणीचे पाणी द्यावे. लागवडीनंतर १० दिवसांच्या आत जी रोपे मेली असतील त्याठिकाणी नवीन रोपांचे नांगे भरून घ्यावेत

Leave a Comment

error: Content is protected !!