व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

सोयाबीन रोग नियंत्रण |सोयाबीन पिकावरील विविध रोग व त्यांचे नियंत्रण


कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देणारे एक नगदी पीक म्हणून सोयाबीन पिकाच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. देशातील या पिकाखालील असलेल्या क्षेत्रापैकी जवळपास ३५ टक्के क्षेत्र हे एकट्या महाराष्ट्राच आहे. सोयाबीनमध्ये १८-२० टक्के तेलाचे आणि ३८-४० टक्के प्रथिनांचे प्रमाण आहे. जनावरांसाठी तसेच कुक्कुटपालनासाठी देखील सोयाबीन पेंडीचा पौष्टिक आहार म्हणून उपयोग केला जातो. आंतरपीक, दुबारपीक तसेच पीक फेरपालटीमध्ये सोयाबीन अतिशय महत्वाचे पीक आहे. सोयाबीनच्या अधिक उत्पादनासाठी आपल्याला पिकाचे लागवड तंत्रज्ञान, शिफारशीनुसार तणाचा, किडींचा तसेच रोगांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. त्यासाठी सोयाबीन पिकावर येणाऱ्या महत्त्वाच्या रोगांची ओळख व व्यवस्थापन खालीलप्रमाणे आहे.

कॉलर रॉट (बुंधा कुज):-

हा रोग ‘स्क्लेरोसीअम रॉल्फसी’ या जमिनीत वास्तव्य करणाऱ्या बुरशीमुळे होतो. – पीक वाढीच्या काळात उष्ण व दमट हवामान या बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल असते. – जमिनीलगत असलेल्या खोडाच्या खालच्या भागाला बुरशीची पांढरी वाढ झालेली आढळते. तसेच बुरशीची पांढरी बिजेही आढळून येतात.    – त्यांनतर खोडाचा बुरशीग्रस्त भाग सडू लागतो, त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त रोपे सुकू लागतात व मरून पडतात.

व्यवस्थापन:- पेरणीपूर्वी बियाण्यास ३ ग्राम थायरम किंवा २.५ ग्राम कार्बेन्डाझिम किंवा १.५ ग्राम थायरम + १.५ ग्राम कार्बेन्डाझिम या बुरशी नाशकाची बीजप्रक्रिया करावी. – बुरशीजन्य रोपे उपटून शेताच्या बाहेर पुरुन टाकावीत असे केल्याने रोगग्रस्त रोपाच्या बुरशी लगतच असलेल्या चांगल्या रोपांपर्यंत जाण्यापासून बचाव होतो. – रोगग्रस्त रोपे उपटलेल्या जागेवर कार्बेन्डाझिम २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून स्प्रे पंपाचे नोझेल काढून आळवणी करावी, तसेच पिकाची फेरपालट करावी.

पिवळा मोझॉक विषाणू: –

हा विषाणूजन्य रोग असून याचा प्रसार पांढरी माशी या किडीद्वारे होतो.     – रोगट झाडांच्या पानांचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो.         – शेंड्यावरील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात.         – पानांच्या शिराजवळ पिवळे डाग दिसतात.

व्यवस्थापन:-   रोगप्रतिकारक/ सहनशील वाणांची पेरणी करावी, जसे की, जे.एस.२०-६९, जे.एस. २०-२९, जे.एस. ९७-५२ आणि जे.एस. ९५-६०.        – आंतरपीक व मिश्रपीक घेतल्यास रागाचे प्रमाण कमी असल्याचे आढळते.        – पिवळे चिकटे सापळे साधारणपणे ६४ प्रति एकर प्रमाणे १५×३० से.मी. आकाराचे सापळे उगवणीनंतर १०-१५  दिवसांनी पिकाच्या समकक्ष उंचीवर लावावेत.        – पिक उगवणीनंतर २०-२५ दिवसांनी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.        – पांढऱ्या माशीच्या नियंत्रणाकरिता आंतरप्रवाही कीटकनाशकांचा वापर करावा. उदा, थायमेथोक्झाम २५ डब्लू.  जी.१०० ग्रॅम किंवा इथोफिनप्रोक्स १ लिटर प्रति हे. ५०० ली.पाण्यात मिसळून फवारावे.

तांबेरा:-

हा रोग बुरशीजन्य असून या रोगांमुळे सुरुवातीला झाडाच्या पानाची खालची बाजू पिवळसर तांबूस ठिपक्यांनी दिसते व नंतर हेच ठिपके पानाच्या वरच्या बाजूवर आल्याचे दिसते. – हा रोग हवेमार्फत पसरतो आणि काहीच अवधीमध्ये त्या परिसरातील सर्व पिकावर पसरतो. – रोगाची तीव्रता जास्त असल्यास ही बुरशी पानाच्या देठावर पसरते त्यामुळे मोठ्या प्रमाणात पानगळ होऊन शेंगा पोचट व दाणे चपटे राहतात, आणि उत्पादनात ५० ते ८० टक्क्यांपर्यंतची लक्षणीय घट झाल्याचे दिसून येते.

व्यवस्थापन:-   या रोगाच्या नियंत्रणासाठी रोग प्रतिबंधक जातीची लागवड हाच एकमेव खात्रीशीर उपाय आहे. उदा, फुले कल्याणी (डी. एस.२२८), फुले अग्रणी (के.डी. एस.३४४) व फुले संगम(के.डी. एस.७२६)        – प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रात सोयाबीन पिकाची पेरणी लवकर म्हणजे १५-२५ मे च्या दरम्यान करावी.  त्यामुळे तांबेरा रोग येण्याच्या आधी पिक परिपक्व होऊन येणाऱ्या रोगापासून बचाव होतो.     – रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास प्रोपीकोण्याझोल २५% प्रवाही १० मिली. किंवा हेक्झाकोण्याझोल ५ %   प्रवाही १० मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मोझॉक:-

– हा रोग सोयाबीन मोझॉक व्हायरस (पोटीव्हयरस) या विषाणूमुळे उद्भवतो. – या रोगाचा प्रसार, मावा किडीद्वारे व बियाण्यापासून होतो.   – रोगग्रस्त झाडाची वाढ खुंटलेली दिसते तर पाने आखूड, लहान, जाडसर  व सुरकुतलेली होतात.   – रोगग्रस्त रोपांना फळधारणा कमी प्रमाणात होते व झाल्यास तेही खुरटलेलीच असतात.

व्यवस्थापन:-    केंद्रीय कीटकनाशक मंडळाद्वारे लेबल क्लेम शिफारशीत आंतरप्रवाही कीटकनाशकाची फवारणी करावी.

शेंगावरील करपा-

हा रोग कोलेटोट्रिकम डेमाटीअम या बुरशीमुळे होतो, या रोगास “पॉड   ब्लाईट” असेही म्हणतात. – यामध्ये विशिष्ट असा कोणताही आकार नसलेली व मोठे होत जाणारे लालसर अथवा गडद तपकिरी ठिपके पाने, खोड आणि शेंगावर दिसून येते. –  कालांतराने शेंगावर बुरशीचे काळे बिजाणू तयार होतात, अशा शेंगा तपकिरी / काळ्या पडतात व बी तयार होण्याच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होतो. – ही बुरशी पानावर, खोडामध्ये तसेच शेंगामध्ये सुप्तावस्थेत राहते.  

व्यवस्थापन:-  पेरणीकरिता निरोगी उत्तम उगवणक्षमता असलेले बियाणे घ्यावे.       – पेरणीपूर्वी (कार्बेन्डाझिम ३७.५ टक्के + थायरम ३७.५ टक्के) मिश्र घटक ७५ टक्के डी. एस. ची ३ ग्रॅम प्रति किलो  बियाणे किंवा २.५ ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. – रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास टेबुकोनाझोल १० % डब्लू.पी. + सल्फर ६५ % डब्लू.जी. २५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून झाडावर फवारणी करावी.  

पानावरील बुरशिजन्य ठिपके-

हा रोग सारकोस्पोरा तसेच अलटर्निया बुरशीच्या प्रजातीमुळे होतो.   – झाडाच्या पानावर, खोडावर व शेंगावर तपकिरी रंगाचे, विशिष्ट आकाराचे व आकारमानाचे गडद वलय असलेले ठिपके आढळतात. – कालांतराने पानावरील ठिपक्यांचा आतील भाग गळून पानाला छिद्रे पडतात. – आद्र हवामान या रोगाच्या प्रसारास अनुकूल ठरते.

व्यवस्थापन:- – पेरणीपूर्वी बियाण्यास (कार्बेन्डाझिम ३७.५ टक्के + थायरम ३७.५ टक्के) मिश्र घटक ७५ टक्के डी. एस. ची ३ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. – रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास पायरॉक्लोस्ट्रॉबिन २० % डब्लू. जी. किंवा टेबुकोण्याझोल १० % डब्लू.पी. + सल्फर ६५% डब्लू.जी. २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  

मूळ व खोडसळ: –

 या रोगाची लागण रोपावस्थेपासूनच दिसून येते.  – रोगाची लागण जमिनीलगतच्या खोडावर तसेच मुळावर भुरकट काळपट डागांनी होते. – खोडाची व मुळाची साल रोगग्रस्त झाल्याने रोपांना अन्नपुरवठा होत नाही. त्यामुळे पाने पिवळी पडून गळतात व नंतर रोपे जमिनीलगत कोलमडून मरून जातात.  जमिनीत कमी ओलावा तसेच जमिनीचे तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअस या बुरशीच्या वाढीला अनुकूल  आहे.

व्यवस्थापन:- बियाण्यास कार्बेन्डाझिम १.५ ग्रॅम + थायरम १.५ ग्रॅम मिश्रण घेऊन प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी व नंतर ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीची ४ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.  –  जमिनीत निंबोळी पेंड किंवा तत्सम सेंद्रिय खते टाकावीत  –  पावसाचा खंड पडल्यास ओलाव्यासाठी पाणी द्यावे.

पानावरील जिवाणूचे ठिपके: –  

हा रोग झानथोमोनास आक्झॉनोपॉडीस पी. व्ही.ग्लायसिन्स या जिवाणूमुळे होते.   हा रोग झाडाच्या पानांवर व शेंगावर त्रिकोणी, चौकोनी आकाराचे तपकिरी करड्या रंगाचे ठिपके दिसून येतात. – ठिपक्यांच्या भोवती पिवळसर वलय दिसते, व ठिपक्यांचे प्रमाण जास्त झाल्यास पाने गळून पडतात.     – हे जिवाणू पिकाच्या अवशेषात किंवा जमिनीवरील बियाण्यात विश्रांती घेतात.     – या जिवाणूंचे वहन वारा, पाण्याचे थेंब आणि किडीद्वारे होते.   – ते झाडाच्या नैसर्गिक छिद्रातून किंवा शेतकाम करतांना झाडाला झालेल्या जखमातून आत प्रवेश करतात. व्यवस्थापन:- – यजमान (होस्ट) नसणाऱ्या पिकाबरोबर पिकाची फेरपालट करावी. – खत वापरात पालाश व स्फुरद असण्याची काळजी घ्यावी. – पिक निघाल्या नंतर खोल नांगरणी तसेच झाडाचे सर्व अवशेष काढून जाळुन घ्यावे.

उपाय- रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास कॉपर ऑक्झिक्लोराईड ३० ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लीन १ ग्रॅम प्रति १० लिटर   पाण्यात मिसळून फवारणी करावी.  

संपर्क- श्री.शरद एस. भुरे वनस्पती रोगशास्त्र, तेलबिया संशोधन प्रकल्प, कृषि महाविद्यालय नागपुर मो.९५८८६१९८१५ डॉ. बिना नायर डॉ. संदीप कामडी श्री.गणेश कंकाळ श्री. जगदीश पर्बत

Leave a Comment

error: Content is protected !!