पीक संरक्षण :
रोग टोमॅटोमध्ये प्रामुख्याने मर, करपा, विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. तसेच फळे पोखरणारी अळी, नागअळीचा प्रादुर्भाव दिसून येतो.
मर : हा बुरशीजन्य रोग असून, झाडे अचानक वाळू लागतात. उपटलेल्यानंतर मुळे कुजलेली दिसतात. रोपवाटिकेत प्रादुर्भाव झाल्यास रोप मरगळलेली, माना पडलेली दिसतात.
नियंत्रण ः रोपांच्या मुळांजवळ खुरप्याने रेघा ओढून कॉपर ऑक्सिक्लोराइड २५ ग्रॅम प्रति १० लिटर या द्रावणांची जिरवण करावी. लागवडीनंतर कॉपर ऑक्सिक्लोराईड ३० ग्रॅम प्रति १० लिटर या द्रावणांची प्रतिझाड ५० ते १०० मि.लि. प्रमाणे जिरवण करावी.
करपा : यात लवकर येणारा व उशिरा येणारा, असे दोन प्रकार आहेत. पानांवर पिवळसर डाग पडून नंतर गोल काळे तपकिरी ठिपके दिसतात. नंतर पाने वाळतात.
नियंत्रण ः मॅन्कोझेब २५ ग्रॅम प्रति १० लिटर किंवा टेब्युकोनॅझोल १० मि.लि. प्रति १० लिटरप्रमाणे फवारणी करावी. पुढील फवारणी तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावी.
विषाणूजन्य रोग : टोमॅटोमध्ये प्रामुख्याने ग्राऊंडनट बड नेक्रॉसीस व्हायरस व पर्णगुच्छ (लिफकर्ल व्हायरस) हे विषाणूजन्य रोग आढळतात. त्यांचा प्रसार फुलकिडे, पांढरी माशी यामुळे होतो. या किडींचे नियंत्रण केल्यास रोगांचे प्रमाण कमी ठेवता येते.
किडीच्या नियंत्रणासाठी: प्रोफेनोफॉस किंवा डायमेथोएट १५ ते २० मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी. रोग शेतामध्ये आढळल्यास झाडे उपटून नष्ट करावीत.
फळे पोखरणारी अळी : ही अळी पाने खाते. नंतर हिरवी किंवा पिकलेली फळे पोखरून आत शिरते.
नियंत्रण ः क्विनॉलफॉस २० मि.लि. प्रति १० लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी. हेलीओथिस न्युक्लिअर पॉलिहेड्रोसीस व्हायरस (एचएनपीव्ही) विषाणूजन्य कीटकनाशक २०० मि.लि. प्रति २०० लिटर पाण्यातून संध्याकाळी फवारावे.
नागअळी : या अळ्या पानांच्या पापुद्र्यामध्ये शिरून हिरवा भाग खातात. परिणामी पानांच्या अन्न निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये बाधा येते.
नियंत्रण ः रोपांची लागवड करतेवेळी अशी पाने काढून टाकावीत. ४ टक्के निंबोळी अर्काच्या २ ते ३ फवारण्या द्याव्यात. अळीचे प्रमाण वाढल्यास अबामेक्टीन ४ मि.लि. प्रति १० लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी. पुढील फवारणी तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावी.