मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू असतानाच आता नागपूर ते विजयवाडा दरम्यान 457 किलोमीटर लांबीचा नवीन महामार्ग बांधण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. 14,666 कोटी रुपये खर्चून बांधला जाणारा हा महामार्ग 2027 पर्यंत वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.
हा महामार्ग चार पदरी आणि प्रवेश नियंत्रित असेल. काही ठिकाणी हा मार्ग विद्यमान रस्त्यांचा वापर करून बांधला जाणार आहे (ब्राउनफिल्ड), तर काही भागात नवीन रस्ता बांधला जाणार आहे (ग्रीनफिल्ड). यामुळे नागपूर आणि विजयवाडा या दोन प्रमुख शहरांमधील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल.
Maharashtra New Expressway
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून सध्या मुंबई ते नागपूर दरम्यान विकसित होत असलेल्या समृद्धी महामार्गाचे युद्ध पातळीवर काम सुरू आहे. आतापर्यंत समृद्धी महामार्गाचा सहाशे किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाला आहे. नागपूर ते भरविर हा 600 किलोमीटर लांबीचा मार्ग सध्या वाहतुकीसाठी सुरू आहे.
विशेष म्हणजे उर्वरित 100 Km चा मार्ग सुद्धा लवकरच वाहतुकीसाठी सुरू होणार अशी माहिती समोर येत आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार भरवीर ते आमने या 100 किलोमीटर लांबीच्या मार्गापैकी भरवीर ते इगतपुरी हा 25 किलोमीटर लांबीचा मार्ग पूर्णपणे बांधून तयार झाला आहे.
तसेच हा टप्पा लवकरच सर्वसामान्यांसाठी सुरू होऊ शकतो अशी देखील माहिती समोर येत आहे. एकंदरीत येत्या काही महिन्यात संपूर्ण समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी सुरू होईल आणि यामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास जलद होईल अशी आशा व्यक्त होत आहे.
नवीन महामार्ग 457 किलोमीटर लांबीचा असणार
नागपूरसहित संपूर्ण विदर्भातील जनतेला या महामार्गामुळे राजधानी मुंबईकडे जलद गतीने जाता येणार आहे. अशातच आता नागपूरवासीयांसाठी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे नागपूर ते विजयवाडा दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून 457 किलोमीटर लांबीचा नवीन महामार्ग तयार केला जाणार आहे.
हा एक चार पदरी आणि प्रवेश नियंत्रित महामार्ग राहील. हा महामार्ग पूर्णपणे ग्रीन फील्ड राहणार नाही. काही ठिकाणी हा महामार्ग ब्राऊनफिल्ड राहील.
अद्याप या महामार्गाचा डीपी आर म्हणजेच डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट ऑनलाइन उपलब्ध झालेला नाही. तथापि लवकरच या प्रकल्पाचा डी पी आर ऑनलाईन उपलब्ध होईल अशी माहिती समोर येत आहे.
या प्रकल्पाच्या खर्चाबाबत बोलायचं झालं तर हा संपूर्ण प्रकल्प 14,666 कोटी रुपये खर्चून तयार होईल. या प्रकल्पाचे काम अजून सुरू झालेले नाही मात्र हा संपूर्ण प्रकल्प 2027 अखेरपर्यंत वाहतुकीसाठी सुरू होऊ शकतो असा दावा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून केला जात आहे.
महाराष्ट्रातील कोणत्या गावांमधून जाणार मार्ग
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर ते विजयवाडा दरम्यान प्रस्तावित करण्यात आलेला हा महामार्ग चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील बोडखा, मांडव गोराड चेक मकसुर, वनली, चेक कवडापूर, बोरगाव हिरापूर, लोणार (धोटे), सूमठाणा, पांढरतळा, पाचगाव, आसाळा, बांद्रा, सालोरी खातोडा, परसोडा जामगाव खुर्द, जामगाव बुद्रुक या गावांमधून जाणार आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील कोंढा, विजासन, चारगाव कुणाडा या गावांमधून जाणार आहे.