व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

टोमॅटो शेती साठी खत व पाणी व्यवस्थापन

खत व्यवस्थापन :

  एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन :   माती परीक्षण करून संतुलित प्रमाणात खते वापरावीत.  अ) सेंद्रिय खते ः  प्रतिहेक्‍टर २० टन शेणखत व २०० किलो निंबोळी पेंड. ब) रासायनिक खते ः  मध्यम प्रकारच्या जमिनीस संकरीत वाणासाठी हेक्‍टरी ३०० किलो नत्र, १५० किलो स्फुरद व १५० किलो पालाश. तसेच सुधारित सरळ वाणासाठी हेक्‍टरी २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद व १०० किलो पालाश घ्यावे.  याशिवाय संकरीत व सुधारीत आणि सरळ वाणासाठी हेक्‍टरी २५ किलो फेरस सल्फेट, २५ किलो मॅगनीज सल्फेट, ५ किलो बोरॅक्‍स आणि २५ किलो मॅग्नेशियम सल्फेट द्यावे. माती परीक्षणानुसार खतांच्या मात्रांमध्ये बदल करावेत.  क) जैविक खते ः  एकरी २ किलो ॲझोटोबॅक्‍टर, २ किलो स्फुरद विरघळविणारे जीवाणू व २ किलो पालाश विरघळविणारे जीवाणू हे सर्व १ टन शेणखतात मिसळून द्यावे. खते देताना निम्मे नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. राहिलेले निम्मे नत्र १५, २५, ४० व ५५ दिवसांनी समान हप्त्यांमध्ये विभागून बांगडी पद्धतीने झाडाच्या बुंध्यापासून थोड्या अंतरावर मुळाच्या क्षेत्रात द्यावे. खते दिल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे. या व्यतिरिक्त सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्य लागवडीनंतर ५ ते ७ दिवसांनी द्यावेत.

पाणी व्यवस्थापन :

  पाणी व्यवस्थापन करताना जमिनीचा मगदूर व हवामान या गोष्टी विचारात घ्याव्यात.  हलक्‍या जमिनीत पाण्याच्या पाळ्या जास्त द्याव्यात व त्यामानाने चांगल्या जमिनीत पाण्याच्या पाळ्या कमी द्याव्यात.  लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. त्यानंतर आंबवणीचे पाणी द्यावे.  पिकांच्या सुरवातीच्या काळात पाणी जास्त झाल्यास पानांची व फांद्यांची वाढ जास्त होते. म्हणून फुलोरा येईपर्यंत लागवडीपासून अंदाजे ६५ दिवसांपर्यंत पाणी बेताने द्यावे.  ठिबक संचामधून पाणी देताना पिकाची दैनंदिन पाण्याची गरज निश्‍चित करून तेवढेच पाणी मोजून द्यावे.  फुले लागण्याच्या काळात पाण्याचा ताण पडल्यास फुले व फळे गळणे, फळधारणा न होणे या समस्या निर्माण होतात.  पाणी सतत आणि जास्त दिल्यास मुळांना हवेचा पुरवठा होत नाही. झाडाची पाने पिवळी पडतात व उत्पादनात घट येते.  पावसाळ्यात पावसाच्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी द्यावे. हिवाळ्यात ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे व उन्हाळ्यात ६ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

Leave a Comment

error: Content is protected !!